आलोक मराठी नियतकालिक
शास्त्रचर्चेस वाहिलेले पहिले मुक्त मराठी नियतकालिक
।। आलोक ।।
शास्त्रचर्चेस वाहिलेले पहिले मुक्त मराठी नियतकालिक
पुष्प पहिले (२४ जानेवारी, २०२१)
भारतीय उपखंडात नानाविध विषयांचे चिकित्सक पद्धतीने पर्यालोचन करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. त्या अनुषंगे प्रत्येक काळात कुणी ना कुणी हे कार्य हाती घेतल्याचे आणि शास्त्रसंमत शिष्टाचार पाळत पूर्णत्वास नेल्याचे आढळून येते. ह्याच परंपरेचा सन्मान राखत मराठीत अधिकाधिक प्रमाणात शास्त्रीय लेखन व्हावे ह्या जाणिवेने प्रेरित होऊन 'वर्णमुद्रा प्रकाशन' एक नवे कोरे व मुक्त ज्ञानशाखीय नियतकालिक सादर करत आहे. विविध ज्ञानशाखांतील साचलेपणाला सुरुंग लावणाऱ्या, नव्या दृष्टीची आस बाळगणाऱ्या 'आलोक'ची घडण नव्या-जुन्या प्रतिभावंतांचे अभ्यासपूर्ण लेखन मराठीतून एकत्रितपणे प्रकाशित व्हावे ह्या उद्दिष्टाने करण्यात आली आहे. प्रस्थापितांबरोबर संशोधनक्षेत्रात नव्याने पदार्पण करू इच्छिणाऱ्यांचेदेखील लेखन प्रकाशात आणण्याचा आलोकचा मानस आहे. हे नियतकालिक आलोक नित्यमुक्त परवान्यासह वितरित केले जाणार आहे. हा प्रतिमुद्राधिकार मुक्त असणारा मराठीतील पहिला परवाना आहे. ह्या नियतकालिकाची माहिती आपल्याला वेळोवेळी प्रस्तुत दुव्यावर उपलब्ध होईल. तरी शास्त्रसरितेच्या ह्या छोट्या प्रवाहात सहभागी होऊन त्याची सुजल नदी होताना पाहावे ही विनंती.
योगदान
ह्या सामग्रीत सर्व प्रकारच्या सुधारणा वाचकांना सुचवता येऊ शकतात. शुद्धलेखनाच्या सुधारणा, आज्ञावलीय सुधारणा तसेच लेखातील मसुद्याबाबत असलेल्या सुधारणा सुचवण्याकरिता गिटच्या जोड-विनंत्या अथवा गिट तक्रारींचा उपयोग करता येऊ शकतो. 'आलोक' त्या सुधारणांबाबत विचार करून सुयोग्य बदल निश्चितच करेल.
परवाना
ही सामग्री 'आलोक नित्यमुक्त परवान्या'सह वितरित होत आहे. ह्या परवान्याची नवीनतम प्रत पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.